
कर्जत (प्रतिनिधी):- दोन बलाढ्य पॅनल प्रमुखा विरुद्ध लढण्याचे काम आम्हाला करायचे असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन आज इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जात असल्याचे सांगत शेतकरी बचाव पॅनलचे समन्वयक रवींद्र कोठारी यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली व दोन्ही आमदारांवर टीका केली
राजकारणातील अनुभवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रवींद्र कोठारी व लालासाहेब सुद्रिक यांनी काही उमेदवारांना एकत्र करत स्वतंत्र शेतकरी बचाव पॅनल उभे केले असून आज पत्रकार परिषद घेत दोन्ही प्रमुख नेत्यावर टीका केली.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ रोहित पवार व आ. प्रा. राम शिंदे यांनी एकमेका समोर पॅनल उभे केले असताना या दोघांना टक्कर देण्यासाठी आम्ही पॅनल उभा केला आहे यावेळी बोलताना शेतकरी बचाव पॅनलचे समन्वयक रवींद्र कोठारी यांनी गेली अनेक वर्षापासून कर्जत कृषी उत्पन्न बाजार समि तीमध्ये अनेक सोईसुवीधा नाहीत, माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी २०० कोटीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही, मार्केट मध्ये रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही, शेतकऱ्यांसाठी शौचालय सुविधा नाही, मार्केट कमिटी मध्ये मोठा वजन काटा नाही, असे म्हणत मार्केटचा विस्तार होण्याची गरज असल्याचे सांगताना फळ मार्केट सुरू होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. या सुविधा निर्माण करण्यासाठी, त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही निवडणुकीला उभे राहिलो आहोत असे म्हणत गेली तीन वर्ष आ. रोहित पवार यांनी तरी मार्केटला काय दिले, याकाळात ही मार्केटची कोणतीच प्रगती झाली नाही असा ही आरोप करताना, त्यामुळे पुन्हा
त्याच त्याच लोकांना निवडून देताना शेतकऱ्याचे व्यापाऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी आमच्या सारख्या सतत संघर्ष करत असलेल्यांना सभासदांनी संधी द्यावी असे आवाहन कोठारी यांनी केले तर शेतकरी बचाव पॅनलचे निमंत्रक लालासाहेब सुद्रिक यांनी बोलताना राशीन मध्ये जनावराच्या बाजारात अनधिकृत लूट केली जात आहे. त्यावर तक्रार केली मात्र उपयोग होत नाही. हायकोर्टाचे आदेश असताना ही शेतकऱ्याची लूट थांबत नाही यावर आवाज उठविण्याची गरज असल्याचे म्हटले. दोन बलाढ्य नेत्याचे पॅनलमध्ये निष्ठावंत बाजूला ठेऊन उमेदवारी दिल्या गेल्या असून सध्या फक्त श्रेय वादाची लढाई सुरू असून ती थांबणे आवश्यक आहे असे म्हटले. यावेळी रमेश व्हरकटे, महावीर बाफना, केतन पांडुळे, रामण्णा तोरडमल आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते