रस्त्याचे डांबरीकरण व कुकडी कॅनॉलच्या अपूर्ण साऱ्यांचे काम पूर्ण करा अन्यथा लोकसभा विधानसभा ,मतदानावर बहिष्कार टाकणार

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील दुरगाव ते सोनाळवाडी, राशीन इ. जि. मा. क्रमांक 81 या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. तसेच कुकडी कॅनॉलच्या अपूर्ण चाऱ्यांचे कामे त्वरित पूर्ण करण्यात यावेत. आदी मागण्यांसाठी आज दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी पासून कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या बाबत तालुक्यातील दुरगाव येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे कळविले आहे. या निवेदनात म्हटले आहे
की दुरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील दूरगाव सोनाळवाडी ते राशीन या सहा किलो मीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अनेक वेळा मागणी करूनही डांबरीकरणा चे काम जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आलेले आहे. किंवा या कामाला कित्येक वेळा मागणी करूनही निधी उपलब्ध करून दिला जात नाही. असा आरोप दूरगाव ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला होता. तसेच या भागातील कुकडी कॅनॉलच्या डी वाय 75 दुरगाव थेरवडी या भागातून जाणाऱ्या कुकडी कॅनॉलच्या अपूर्ण चाऱ्यांचे काम तसेच दुरगाव गावाकडे जाणाऱ्या कुकडीच्या
सर्व चाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात यावे याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कामे होत नाहीत. तसेच दूरगाव- सोनाळवाडी ते राशीन हा रस्ता वाहतुकीसाठी दुरगावचा मुख्य रस्ता असून या गावांमध्ये जड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. तसेच दुरगाव मधे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. सदरील रस्त्यावर पावसाळ्याच्या काळात तीन ते चार महिने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहते. तसेच या रस्त्यावरील नदीवर पूल व सी डी वर्क नसल्यामुळे जनतेला फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या गावासाठी हे विषय अत्यंत महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे आहेत. तसेच कुकडी कॅनॉल ची मागणी अनेक वर्षापासून आहे. कुकडी लाभ क्षेत्रामध्ये दूरगाव शंभर टक्के येत असून अपूर्ण कामामुळे फक्त 30 टक्केच क्षेत्र ओलिता खाली येत आहे. तरी वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही दुरगाव ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी संबंधित विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे. तरी सदरील कामे पूर्ण करण्यात न आल्याने दुरगाव ग्रामस्थांच्या वतीने दिनांक आज दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी पासून कर्जत तहसील कार्यालया समोर संपूर्ण ग्रामस्थ व शेतकरी यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले आहे. तसेच या उपोषणाची दखल न घेतल्यास व कामे त्वरित पूर्ण न केल्यास येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने या निवेदनात म्हटले आहे.