संत श्री गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी पंढरपूरहुन येणार पादुका
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश कर्जतमध्ये रंगणार श्रेयवादाची लढाई

कर्जत (प्रतिनिधी) :- थोर विठ्ठलभक्त आणि कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या रथयात्रेनिमित्त दरवर्षी पंढरपूरहून पादुका आणण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसताच विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्याही दोन कार्यकर्त्यांनीही याबाबतचे पत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीला दिले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता दोन आमदारांमध्ये कर्जतमध्ये श्रेयवादाची लढाई रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे मागील वर्षी २५ सप्टेंबर २०२२ रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी बालाजी पुदलवाड यांची भेट घेतली होती. यावेळी समस्त कर्जतकर नागरिकांच्यावतीने त्यांना पत्रही दिले आणि विठ्ठलाचे परमभक्त संतश्री सद्गुरू गोदड महाराज यांची विठ्ठलभक्ती लक्षात घेता त्यांच्या रथोत्सवानिमित्त दरवर्षी पंढरपूरहून श्री विठ्ठलाच्या पादुका कर्जतला घेऊन येण्याची विनंती केली होती. सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांचा जन्म कर्जत शहरातील असून त्यांना पांडुरंगाने साधू वेशात येऊन “तू तुझ्या जन्मस्थळी समाधीस्थ हो, ते एक महाक्षेत्र म्हणून उदयास येईल”, असा आशीर्वाद दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार संजीवन समाधी घेताना सद्गुरु संतश्री गोदड महाराजांनी पांडुरंगाकडून आषाढीनंतर येणाऱ्या कामिका एकादशीला भेटीसाठी कर्जत येण्याचे वचन घेतले होते. तेंव्हापासून साक्षात भगवान पांडुरंग हे सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या भेटीला कर्जतला येत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच राज्यातील विविध संतांच्या दिंड्या-पालख्या आषाढी-कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जातात, परंतु सद्गुरु संतश्री गोदड महाराजांची दिंडी वारीसाठी पंढरपूरला जात नाही आणि आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कामिका एकादशीला पांडुरंगाची मूर्ती रथामध्ये ठेवून कर्जतमध्ये ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. यावेळी कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य भाविक कर्जतमध्ये सद्गुरू गोदड महाराज आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात.
त्यामुळेच आमदार रोहित पवार यांनी मंदिर समितीचे सदस्य आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या सन्मानार्थ दरवर्षी पंढरपूरहुन पादुका कर्जतला पाठवण्याची, विनंती केली होती. लोकभावना आणि श्रद्धा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून सादर केलेल्या या निवेदनाचा पंढरपूर मंदिर समितीने सकारात्मक विचार केला आणि त्यानुसार पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य अंमळनेकर महाराज आणि इतर विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर गुरुवारी कामिका एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या पादुका कर्जतला येणार आहेत. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काल अडीच किलो वजनाच्या चांदीच्या पादुकाही सद्गुरु संतश्री गोदड महाराज मंदिर समितीला दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पादुका आमदार रोहित पवार यांना पंढरपूरला घेऊन जाऊन तिथं विधिवत पूजा करुन स्वतः आणता आल्या असत्या. पण याचे श्रेय न घेता कोणतेही राजकारण होऊ नये आणि प्रथा-परंपरा जपल्या जाव्यात यासाठी या पादुका सद्गुरु संतश्री गोदड महाराज मंदिर समितीचे सेवेकरी, मानकरी, विश्वस्त या सेवा करणाऱ्या मंडळींकडे त्यांनी सुपूर्द केल्या.
दरम्यान, दुसरीकडे या अध्यात्मिक उपक्रमाला आता राजकीय वळण मिळते की काय अशी जोरदार चर्चा कर्जत तालुक्यात सुरु झाली आहे. कारण विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनीही दोन दिवसांपूर्वी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांकरवी पादुका पाठवण्याबाबतचे पत्र पंढरपूर मंदिर समितीला दिले आहे. प्रा. राम शिंदे यांचा हा केवळ श्रेयासाठीचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कारण आमदार रोहित पवार यांनी मागील वर्षी केलेल्या मागणीमुळे आणि पाठपुराव्यामुळे पंढरपूरहून पादुका आणण्याचा निर्णय घेण्यात आाला आणि याचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठीच प्रा. राम शिंदे यांच्यामार्फत पत्र देण्याची औपचारीकता आता केली जात असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
– रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)