Advertisement
ब्रेकिंग

‘कर्जत-जामखेड‘मध्ये उद्यापासून रंगणार दसरा महोत्सव; पहिल्याच दिवशी विक्रमी उंचीवर फडकणार भगवा स्वराज्य ध्वज

Samrudhakarjat
4 0 1 4 1 4

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्यावतीने यंदाही ‘भव्यदिव्य दसरा महोत्सव २०२३‘ आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान यंदाचा दसरा महोत्सव चालणार आहे. यंदाचे दसरा उत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात नागरिकांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकारचे कार्यक्रम पाहता येणार आहेत. केरळ, पंजाब असे राष्ट्रीय तसेच कॅनडा आणि स्पेनमधील आंतरराष्ट्रीय कलाकारांची कला नागरिकांना पाहता येणार आहे.

 कर्जत-जामखेडमधील नागरिकांना सहकुटुंब कार्यक्रम पाहता येणार आहेत. दिनांक १८ ऑक्टोबर म्हणजेच उद्या सायंकाळी ४ वाजता कर्जतमधील विठ्ठल-रुक्मिणी मैदान, शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक-८ येथे ‘विक्रमी उंचीवर‘ भगवा स्वराज्य ध्वज फडकवला जाणार आहे. ‘भव्यदिव्य कर्जत-जामखेड दसरा महोत्सवा‘तील सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि ड्रोनच्या माध्यमातून जगात सर्वाधिक उंचीवर फडकवल्या जाणाऱ्या भगव्या स्वराज्य ध्वजाला पाहण्यासाठी आपण सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रोहित पवार आणि मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दिनांक १९-२० ऑक्टोबर रोजी कर्जत-जामखेडमधील १६ गावांमध्ये चित्ररथ फिरणार आहे. यामध्ये प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमानजींच्या भव्य चालत्या बोलत्या प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत शहर, राशीन, सिद्धटेक, कुळधरण, चांदे बू., मिरजगाव, चापडगाव, कोरेगाव, शेगुड तसेच जामखेड तालुक्यातील जामखेड शहर, फक्राबाद, अरणगाव, साकत, नान्नज, जवळा, शिऊर, दिघोळ, राजुरी, खर्डा या गावांमधून मिरवणूका जाणार आहेत. कर्जत-जामखेडमधील नागरिकांना पहिल्यांदाच १२ फुटांहून अधिक उंचीच्या हनुमानजींच्या चालत्या बोलत्या प्रतिकृतीची मिरवणूक, तसेच अनेक गाजलेल्या कलाकृती आणि कलाकार यांना भेटण्याची आणि पाहण्याची संधी मिळणार आहे. 

यंदाच्या दसरा महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला कार्यक्रम दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत पार पडणार आहे. यामध्ये अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार सहभाग घेणार आहेत. यामध्ये खर्डा येथील भगव्या स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने सादर केला जाणारा ‘लेझर शो‘ हे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा लेझर शो ‘दुबई इंटरनॅशनल शो‘ तसेच ‘अयोध्या दीपोत्सव‘ सह देशातील विविध राज्यातील मोठमोठ्या कार्यक्रमात दाखवण्यात आलेला आहे. तब्बल ८-१० किलोमीटर वरूनही हा शो पाहता येणार आहे. त्याचबरोबर केरळ येथील प्रसिद्ध डान्स ग्रुपचा ‘शबरी चेंडे डान्स‘ पाहायला मिळणार आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्रदीपक व आकर्षक विद्युत रोषणाईने खर्डा किल्याची सजावट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंजाबमधील ‘वीर खालसा ग्रुप‘ ‘गटका‘ या पारंपारिक खेळाबरोबर अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणार आहे. परदेशातील सात देशांमध्ये त्यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवली असून अमेरिकेतील ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट‘ या शोचे विजेतेपदही पटकावले आहे. याचबरोबर ‘कोल्हापुरी मर्दानी खेळ‘ हा संघ शिवकालीन व युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर करणार आहे. याबरोबरच जगातील प्रसिद्ध असलेल्या कॅनडा आणि स्पेन येथील ध्वनी यंत्रणा वाजवली जाणार आहे. त्यामुळे कर्जत जामखेड मधील नागरिकांना पुढील ४ दिवस विविध कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

2/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker