कर्जतमध्ये अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांची कारवाई; तरुणाला अटक

कर्जत | दि. 4 फेब्रुवारी 2025 :- कर्जत शहरातील दादा पाटील कॉलेज ग्राउंडवर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. विकास दत्तू सकट (वय 24, रा. टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्ह्याचा तपशील
दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10:05 वाजण्याच्या सुमारास दादा पाटील कॉलेज ग्राउंड परिसरात एका तरुणाकडे संशयास्पदरीत्या शस्त्र असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. त्यानुसार, कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी किरण संजय बोराडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित तरुणाची तपासणी केली असता, त्याच्याकडे एक लोखंडी पिस्तूल (काळ्या रंगाच्या ग्रिपसह) व एक मॅगझिन तसेच तीन जिवंत काडतुसे मिळून आली.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 2:25 वाजता अटक करण्यात आली.
जप्त माल
पोलिसांनी आरोपीकडून एकूण ₹36,000/- किमतीचा माल जप्त केला आहे, त्यामध्ये –
एक लोखंडी पिस्तूल (₹30,000/- किंमत)
एक मॅगझिन तीन जिवंत काडतुसे (₹6,000/- किंमत)
पोलिसांची कामगिरी
ही यशस्वी कारवाई कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुलानी, पो.का. किरण बोराडे, पोना. शामसुंदर जाधव, पोहेका. भांडवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
आरोपीने हे शस्त्र कोठून मिळवले? त्याचा हेतू काय होता? त्याने यापूर्वी अशा प्रकारची कोणतीही गुन्हेगारी कृत्ये केली आहेत का? याचा अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.