राशिन ग्रामपंचायतच्या जुन्या पाईपलाईनची चोरी आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राशीन ग्रामपंचायतची खेड ते राशीन अशी राशीन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या बंद पडलेल्या पाईपलाईनचे पाईप गॅस कटरने कापून चोरी करताना चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही चोरी पकडण्यात आली असून पोलिसांनी लोखंडी पाईप, गॅस कटर व टाटा इंट्रा गाडी असा ५ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त करून ८ जणांना ताब्यात घेतले आहे. ग्रामपंचायत कर्मचारी दयानंद आढाव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी मध्ये म्हटले आहे, राशीन ग्रामपंचायतीची जुनी पाईपलाईन ही खेड येथुन राशिन येथे आलेली आहे.
परंतु ती नादुरुस्त असल्याने नवीन पाईपलाईन केलेली असून जुनी पाईपलाईन ही जमिनीचे वरुन आहे व ती बंद आहे. शुक्रवारी, (दि. २४) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मला भिमराव साळवे यांनी फोन करुन सांगीतले की, आताच मला आखोणी येथून फोन आला आहे, कोणी तरी लोक ग्रामपंचायतची बंद पाईपलाईन गॅस कटरने कट करुन चोरुन घेऊन जात आहेत. तरी तुम्ही जाऊन खात्री करा. त्यानुसार माझ्यासह ग्रामपंचायत कर्मचारी प्रल्हाद बाबुराव साळवे, संजय वामन मोरे, विनोद सुरेश आढाव, जितेंद्र हौसराव गजरमल असे राशिन येथून आखोणी गावाच्या शिवारात गेलो असता आम्हाला ८ लोक ग्रामपंचायतची पाईपलाईन गॅस कटरने कट करुन एका टाटा इंट्रा गाडीत भरत होते. दरम्यान आम्ही राशीन पोलीस दूरक्षेत्रात ही माहिती दिली.
खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक गाडीसह पकडून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) हनुमंत नारायण केवारे, वय ५०, रा. वडापुरी, ता. इंदापुर ( गॅस कटरवाला) २) रोहित नागनाथ अलबत, वय २२, रा. लाखेवाडी, ता. इंदापुर ३) अर्जुन बाळु बिचकुले, वय १९ रा. गाराकुले, ता. माढा, जि. सोलापूर ४) विश्वजीत दादा कांबळे, वय १९, रा. बावडा, ता. इंदापुर ५) मोहन गजेंद्र गायकवाड, वय ५३, रा. मिरे, ता. माळशिरस, जि. सोलापुर ६) सुभाष दशरथ खिलारे, वय ६०, रा. मुसलमानवाडी, ता. इंदापुर ७) अरुण परशु माने, वय ६०, रा. अकलुज, ता. माळशिरस ८) नागेश सिताराम मोरे, वय ३१, रा. अकलूज अशी सांगितली. त्यावेळी आम्ही त्यांच्याजवळ असणारी टाटा इन्ट्रा गाडी पाहिली असता तिचा नंबर एमएच ४२, बीएफ ३०१८ असा आढळून आला. त्यावेळी आम्ही त्यांना तुम्हाला येथे कोणी कामास आणले असे विचारले असता त्यांनी अभिजीत किशोर साळुंके, रा. बावडा, ता. इंदापुर याने आणलेले आहे व तो पाईपलाईन दाखवून त्याच्या मोटार सायकलवरून गेलेला आहे असे सांगितले.
त्यांच्या गाडीत ग्रामपंचायतचे बंद असलेल्या जुने ८ इंची पाईप लाईनचे २८ लहान मोठे लांबीचे तुकडे होते. त्यावेळी आम्ही ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे यांना फोन करुन ही माहिती दिली. दरम्यान सर्व आरोपी व मुद्देमाल राशीन दूरक्षेत्रातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यामध्ये १ लाख २० हजार रुपये किंमतीचे लोखंडी पाईप, १५ हजार रुपये किमतीचा गॅस कटर संच तसेच ४ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाच्या टाटा इन्ट्रा गाडीचा समावेश होता. अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.