कर्जत शहरातील बर्गेवाडी रोड वरील थोरात वस्ती येथील बावर एंटरप्रायजेस,भारत गॅसचे गोडाऊन तातडीने बंद करून दुसरीकडे हलवावे समस्त नागरिकांची मागणी

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे युवकचे शहराध्यक्ष नामदेव गोविंद थोरात राहणार बर्गेवाडी थोरातवस्ती, ता. कर्जत, जि. अहमदनगर यांच्या वतीने कर्जत चे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्जत-बर्गेवाडी रोडवरील थोरात, नेटके, बरबडे इत्यादी कुटूंब बावर एंटरप्राइजेसच्या भारत गॅसच्या गोडाउन परिसरात ५०० मीटरच्या आत मध्ये रहिवास करत आहेत. दिनांक 1 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास या गॅस गोडाउनच्या कंपाऊंड जवळच गॅस टाकीने पेट घेतल्यामुळे त्या ठिकाणी लागोपाट १३ गॅस टाक्यांचे स्फोट झाले आहेत.
या घटनेत दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर येथील सर्व रहिवाशी अतिशय भयभित झालेले असून पुन्हा अशी दूर्घटना घडल्यास आमच्या जिवीतास गंभीर धोका निर्माण झाला आहे. असे थोरात यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच या निवेदनात म्हटले आहे की या घटनेची गंभीर दखल घेऊन भारत गॅसचे गोडाऊन या जागेवरुन तातडीने अन्यत्र हलविण्यात यावे. अन्यथा शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४ पासुन या गोडाऊनच्या
परिसरातील सर्व रहिवाशी लहान मुले, महिला व सर्व वयोवृद्ध नागरिकांसोबत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत. तसेच गॅस गोडाऊन चे व्यवस्थापक आणि झालेल्या दूर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे. अन्यथा संभाव्य होणाऱ्या परिणामांस आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात थोरात यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, कर्जत उपविभाग, कर्जत व पोलिस निरिक्षक कर्जत पोलिस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.