कर्जतमध्ये पंचायत समितीच्या ग्रामसेवका यांचा विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

समृध्द कर्जत : कर्जत तालुक्यातील एका गावच्या ग्रामसेविकेने विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विस्तार अधिकाऱ्याने कर्जत पंचायत समिती येथे लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामसेविका या २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कर्जत पंचायत समिती येथे मासिक सभेसाठी गेल्या होत्या.
साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या रिपोर्ट देण्यासाठी मिटींग हॉलमधून बाहेर पडल्या आणि ग्रामपंचायत विभागात गेल्या. त्यावेळी तेथे असलेल्या विस्तार अधिकारी राजा अटकोरे यांनी त्यांना एका ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार दिला होता.
त्यावेळी ग्रामसेविकेने या गावचा कार्यभार माझ्याकडे देऊ नका अशी विनंती अटकोरे यांना केली. त्यावेळी अटकोरे यांनी हे काम पैशाशिवाय होते का ? त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळे द्यावे लागेल असे म्हणत अश्लील वर्तन व विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर ग्रामसेविकेने हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला. त्यांच्या पतींनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी चौकशी केली असता हा आरोप खरा असल्याची खात्री झाली.
त्यामुळे ग्रामसेविकेने पतीसोबत कर्जत पोलीस स्टेशनला जाऊन राजा अटकोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.