कर्जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले. सकल मराठा समाज आणि सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच, रक्तदान शिबिर आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण कर्जत शहर शिवमय झाले होते.
सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
काल कर्जत शहरात सकल मराठा समाज आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत ४५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला, तर विविध सामाजिक संघटनांचे ७० शिलेदारही यात सहभागी झाले. रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कर्जत शहरात “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” अशा घोषणा देत ही रॅली काढण्यात आली.
रक्तदान शिबिराचे आयोजन
शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक शिवप्रेमींनी या शिबिरात सहभाग घेत रक्तदान करून आपला सामाजिक कर्तव्य बजावले. या उपक्रमास कर्जत शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनीही पाठिंबा दिला.
शिवगर्जनाने शहर दणाणले
कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना करून झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, युवा मंडळे आणि हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने कर्जत शहरात विविध ठिकाणी शौर्यगाथा सादरीकरण, संभाजी राजेंच्या जीवनावर व्याख्याने, पोवाडे गायन, तसेच मर्दानी खेळांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण कर्जत शहर शिवमय झाले होते.
शहरात उत्साहाचे वातावरण
शिवजयंतीनिमित्त कर्जत शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका आणि शिवगर्जनेने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यंदा देखील कर्जतकरांनी मोठ्या उत्साहात व शिवप्रेमाने शिवजयंती साजरी केली.