कर्जत : 52 व्या तालुका विज्ञान-गणित प्रदर्शनाचा यशस्वी समारोप

कर्जत, ता. 4 जानेवारी 2025 : कर्जत तालुक्यातील कोटा मेंटॉर्स प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित 52 व्या तालुका विज्ञान-गणित प्रदर्शनाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. 2 जानेवारीपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे समारोप सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा जागर
या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विज्ञान व गणितातील नवनवीन कल्पना आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवणारे प्रकल्प सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाची सुरुवात व मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाची सुरुवात सभापती राम शिंदे यांच्या स्वागत व सत्काराने करण्यात आली.प्राचार्य केशव आजबे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत “आजबे पॅटर्न” ची माहिती दिली. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोग व प्रकल्पांमधून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. विज्ञान आणि गणित हे केवळ विषय नसून, जीवनाचे मार्गदर्शक आहेत. यावर्षी 11thच्या दहा विद्यार्थ्यांसाठी ‘ट्रायबेस’ नावाचा पॅटर्न लागू केला, ज्यामुळे ते सर्वजण 95% गुण मिळवून यशस्वी झाले. हा पॅटर्न व्यापक पद्धतीने राबवण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”
सभापती राम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “विद्यार्थ्यांनो, तुम्ही सादर केलेले प्रकल्प तुमच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहेत. विज्ञान आणि गणित हे विषय फक्त अभ्यासासाठी नसून, वास्तव समस्यांचे समाधान शोधण्यासाठी उपयुक्त आहेत. तुमच्या प्रकल्पांमधून भविष्यातील यशाचा मार्ग खुला होईल.”
गौरव व समारोप सोहळा
कार्यक्रमाच्या समारोपात प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वी आयोजनासाठी कौतुक
कोटा मेंटॉर्स विद्यालयातील शिक्षक, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन करत प्रदर्शन यशस्वी केले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळाली आहे.