आणखी २ शेतकऱ्यांची फसवणूक ; कर्जतच्या ‘लकी’मधून बियाणांची खरेदी

कर्जत (प्रतिनिधी) :- अत्यल्प शेंगा येत असलेल्या उडीद बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार कर्जत तालुक्यात उघड होत आहेत. काही दिवसांपूर्वीच १६ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी कर्जतच्या कृषी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी २ शेतकऱ्यांनी उडीद बियाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. दोन्ही शेतकऱ्यांनी कर्जत येथील जिल्हा सहकारी बँकेसमोरील लकी कृषी सेवा केंद्रातून बियाणांची खरेदी केली होती.
जोगेश्वरवाडी येथील शेतकरी बापुसाहेब गोदेराम भोगे व कर्जत येथील शेतकरी संगपाल ठोसर यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. दोन्ही शेतकऱ्यांनी निर्मल सिड्स या कंपनीचे उडीद बियाणे खरेदी करून त्याची शेतात पेरणी केली. मोठ्या कष्टातून पिकाचे संगोपन केके.
मात्र उडीद पिकाला फुले कमी आणि शेंगाही अत्यंत कमी लागल्या असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. उडीद पीक हे वेलीसारखे पसरले मात्र अपेक्षेप्रमाणे शेंगा आल्या नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.