उद्याचा उज्ज्वल भारत घडविण्यासाठी स्वस्थ राहा ; सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार
विद्यार्थिनींनी स्वतःमधील राजहंस ओळखावा... सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात तेजस्विनी मंच व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्यावतीने आयोजित ‘सोबती’ अंतर्गत आई प्रकल्प ‘स्वस्थ कन्या उज्ज्वल भविष्य’ अभियान हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविताताई व्होरा उपस्थित होत्या. तसेच कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
या कार्यक्रमाला भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर, सेल टॅक्स ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झालेल्या सोनाली निमसे, माजी सभापती राणीताई कानगुडे, माधुरीताई पाटील, डॉ. विद्या काकडे, तांबे सर ज्योती सुर्व आदि मान्यवर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक वर्ग तसेच मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त रेश्मा पुणेकर, सेल टॅक्स ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झालेल्या थेरगावच्या सोनाली निमसे यांनी आपल्या यशस्वी जीवन प्रवासाची यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली.
यावेळी तेजश्री धेंडे, मोनाली पांडुळे, मानसी भोसले, प्रणाली काटकर, आकाश वसतकर आदिंचा सोबती अंतर्गत मेडिकल कॅम्पमधील यशस्वी आयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. सविताताई व्होरा यांनी आपल्या मनोगतात दादा पाटील महाविद्यालयात शिकत असलेल्या सर्व ग्रामीण भागातील मुलींचे कौतुक केले. ग्रामीण भागातील मुली आईसोबत कामे करून आपला संघर्षपूर्ण शिक्षणाचा प्रवास पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींना स्वसंरक्षणासाठी कायम ताकदवान राहावे लागेल. मुलींच्या वाटेला जाणाऱ्या अनेक समाजविघातक प्रवृत्ती सध्या बळावत चालल्या आहेत. अशा प्रवृत्तीच्या विरोधात मुलींना संघर्ष करावा लागणार आहे. चांगल्या घरातील संस्कारी मुले हे मुलींचे वाटोळे कधीच करत नाहीत. परंतु काही समाजविघातक मुलांच्या अफवांना बळी पडून काही मुली स्वतः फसतात, अशा अपप्रवृत्तीखोर मुलांना मुलींनी वेळीच ओळखले पाहिजे. आई वडील कष्टाला कधीच घाबरत नसतात तर ते अब्रूला घाबरतात. त्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान शरमेने खाली जाईल असे कुठलेही कृत्य मुलींकडून होऊ नये यासंबंधी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी ‘स्वस्थ कन्या- उज्ज्वल भारत’ अंतर्गत उद्याचा भारत सांभाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले. १३ ते १९ वयोगटातील मुलींनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजे. आज महिलांचे लैंगिक, शारीरिक आणि आर्थिक पातळीवरील शोषण केले जाते. कुठलेही शोषण हे वाईटच असते. शिकार ही नेहमी कमकुवत असणाऱ्यांचीच होत असते. आज पाच ते दहा टक्के मुली ह्या अशा शिकारीला बळी पडत आहेत. याकरिताच शारीरिक सक्षमता मजबूत असणे खूप गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेम आणि वासना यातील फरक मुलींनी ओळखला पाहिजे. खरे प्रेम मुलींना ओळखता आले पाहिजे. मुलींच्या तारुण्याचा काळ हा सुवर्णकाळ असतो. परंतु याच वयात मुली चुकीच्या नादाला लागून आयुष्य वाया घालविण्याचा प्रयत्न करतात. याकरिता प्रत्येक मुलीने आपल्यातला दडलेला राजहंस ओळखून यशाचे शिखर गाठले गेले पाहिजे. मुलींनी सोशल मिडियाचा अतिशय सावधानतेने वापर केला गेला पाहिजे. आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे तेच क्षेत्र आपण करिअरसाठी निवडावे. कोणत्याही कष्टाची व कामाची लाज बाळगू नये. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेटपटू किरण नवगिरे, यूपीएससी उत्तीर्ण स्नेहल धायगुडे, भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर,सुरेखा कोरडे यांचा दाखला देत अनेक मुली आज देशाचे नाव उंचावत असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी गीतांजली कुदळे, वैष्णवी घोडके, सिद्धी मांढरे, साक्षी वाघ, श्रावणी काळे, सानिका पिंगळे, त्रिवेणी वाघमारे, भाग्यश्री तांबे, उत्कर्षा रंधवे, साक्षी नेटके, श्रेया जाधव, तेजस्विनी बरगडे, क्रितिका सरोदे, साक्षी शिरसाटे, सोनाली सुद्रिक आदि मुलींनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. महिला विकास समितीच्या समन्वयक डॉ. माधुरी गुळवे यांनी आभार मानले. डॉ. प्रतिमा पवार व डॉ. भारती काळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.