कुळधरणच्या श्री क्षेत्र जगदंबा मंदिराच्या विकासासाठी ३ कोटी ५६ हजारांचा निधी मंजूर
प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; दगडी सभामंडप उभारणीला प्रशासकीय मान्यता


कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील श्री क्षेत्र जगदंबा मंदिर देवस्थानाच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत मंदिराच्या मुख्य सभामंडपाच्या उभारणीसाठी शासनाने ३ कोटी ५६ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या विकासकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण भागातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या यात्रास्थळांचा विकास व्हावा, भाविकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना राबविण्यात येते. याच योजनेंतर्गत कुळधरण येथील श्री क्षेत्र जगदंबा मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाची राज्यस्तरीय निकष समितीच्या बैठकीत छाननी करण्यात आली. विकासकामांची अंदाजपत्रके तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर समितीने निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस केली. त्यानुसार शासनाने या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
दगडी सभामंडपामुळे मंदिराच्या वैभवात भर
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतुदीतून मुख्य मंदिराचा दगडी सभामंडप उभारण्यात येणार आहे. या कामामुळे मंदिराच्या विकासाला गती मिळण्यासोबतच परिसरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री क्षेत्र जगदंबा मंदिर हे कुळधरण परिसरातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असून, या विकासकामामुळे मंदिराच्या सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.




