कर्जत तालुक्याचा अभिमान! खांडवी गावचा आदेश तापकीर याने राज्यस्तरीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले


कर्जत तालुक्यातील खांडवी गावचा सुपुत्र आदेश तापकीर याने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. या यशामुळे कर्जत तालुक्याचे नाव राज्यस्तरावर झळकले आहे.
आदेश तापकीर सध्या पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील युनायटेड शटल अकॅडमीमध्ये प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करीत आहे. त्याने अपार मेहनत, चिकाटी आणि खेळावरील निष्ठेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

विशेष म्हणजे, आदेश तापकीर हा पॅरा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारा कर्जत तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी आणि स्थानिक क्रीडा प्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे.
आदेशच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्याची आगामी राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आता तो भारताच्या पातळीवर पदक जिंकून कर्जत तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याचा मान उंचावण्याचा निर्धार करून सज्ज झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक आणि क्रीडा प्रेमींनी आदेशच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




