राशीनमध्ये जगदंबा देवी दर्शनासाठी भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी!
सिंहारूढ रूपातील मनमोहक पूजा पाहून भाविकांचे डोळे झाले पाणावले


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राशीन (ता. कर्जत) येथे श्री जगदंबा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा महापूर लोटला आहे. यंदाच्या उत्सवात देवीच्या दर्शनासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळत असून, संपूर्ण राशीन नगरी भक्तिमय वातावरणात तल्लीन झाली आहे.
या नवरात्रोत्सवात देवीची साकारण्यात आलेली ‘सिंहारूढ पूजा’ भाविकांसाठी पर्वणी ठरली. सिंहावर विराजमान झालेल्या देवीचे हे अत्यंत विलोभनीय आणि तेजोमय रूप पाहून उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. आई जगदंबाचे हे मनमोहक व दिव्य रूप डोळ्यात साठवून घेताना अनेक भाविकांच्या आनंदाश्रूंनी डोळे पाणावले, तर काहींनी भक्तीभावाने देवीच्या चरणी नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली.

भक्तांच्या अलोट गर्दीने दुमदुमली राशीन नगरी
राशीनच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, मराठवाडा यांसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली असून, ‘आई जगदंबाचा जयघोष’ व घंटानादामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

भाविक भक्तांना सुलभ व शिस्तबद्ध दर्शन मिळावे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर विश्वस्त व्यवस्था आणि स्थानिक प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या महाउत्सवामुळे सध्या राशीनमध्ये चैतन्यमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




