बकरी ईद निमित्त राशीनमध्ये तीन दिवस कुर्बानीची परवानगी द्यावी; बबलूभाई कुरेशी यांची ग्रामपंचायतीकडे मागणी


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – राशिन व परिसरामध्ये मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर, मुस्लिम धर्मानुसार बकरी ईद निमित्त गुरुवार दिनांक २८ मे २०२६ ते शनिवार दिनांक ३० मे २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत ठराविक जनावरांच्या कुर्बानीसाठी रीतसर परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
इरफान मस्जिद कुरेशी उर्फ बबलूभाई यांनी राशीन ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी यांना या संदर्भातील मागणीचे निवेदन दिले आहे.
शासकीय नियमांचे पालन करणार

या निवेदनात बबलूभाई कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे की, मुस्लिम समाज बांधव शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमावलींचे आणि अटींचे काटेकोरपणे पालन करतील. सर्वतोपरी स्वच्छता व आवश्यक ती दक्षता घेऊनच ही धार्मिक प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यामुळे प्रशासनाने आपल्या स्तरावर या तीन दिवसांच्या कालावधीसाठी तात्काळ परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन राशीन पोलीस दूरक्षेत्रला देखील देण्यात आले आहे.


