मोबाईल वापरायचा मोह टाळा… प्राचार्य डॉ. संजय नगरकर


(कर्जत प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयामध्ये वर्ल्ड डिजिटल डेटॉक्स डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की, काळानुरूप विज्ञानात बदल होत आहे. मोबाईल ही सुखवस्तू व मानवाची मूलभूत गरज बनली आहे. मात्र जेव्हा यंत्राचे राक्षसात रूपांतर होते तेव्हा विध्वंस होतो. म्हणून सर्व जगभर आज मनाची व मेंदूची स्वच्छता करण्यासाठी वर्ल्ड डिजिटल डेटॉक्स डे साजरा करण्यात येतो आहे. मानवाच्या रागाचे कारण मोबाईल बनत आहे. मोबाईलच्या आहारी गेल्यास उद्याचा काळ आपल्याला माफ करणार नाही. मोबाईल वापराचा मोह टाळा व पुस्तकांशी मैत्री करा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस मोबाईल न वापरण्याची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली व कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व सेवक उपस्थित होते.




