डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्णाभाऊ साठे विटंबना प्रकरणी कर्जत शहर बंद…

कर्जत प्रतिनिधी : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांची इस्ट्राग्रामवरून विटंबना झाल्याच्या निषेधार्थ कर्जत शहरात शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी कर्जत बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कर्जत पोलिसांना देण्यात आले असून, आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची, तर शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची सोशल मीडियावर विटंबना करण्यात आली. या प्रकारानंतर लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी शुक्रवारी मोठ्या संख्येने कर्जत पोलिस ठाण्यावर धडक देत जोरदार घोषणाबाजी करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
यावेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देऊन शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी कर्जत शहर कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या निवेदनावर सनी पवार, दादा थोरात, आशिष पवार, सुधीर पवार, राहुल पवार, कपिल पवार, संजय पवार, अशोक पवार, दिगंबर पवार यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या आंदोलनाला आर. पी. आय. (आठवले गट) यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी आर. पी. आय. तर्फेही पोलिसांकडे निवेदन देऊन संबंधित आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कर्जत शहरात बंद आणि रस्ता रोको आंदोलन होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.





