Advertisement
ब्रेकिंग

पाटेगाव-खंडाळा MIDC मंजुरीचा विषय पेटला; रोहित पवारांसह मतदारसंघातील युवा,नागरिक उपोषणावर ठाम

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीला वारंवार पाठपुरावा करूनही मंजुरी मिळत नसल्याने युवा, नागरिक थेट मंत्रालयात

Samrudhakarjat
4 0 1 9 4 3

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत होते. अशातच कर्जत जामखेड मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी देण्यासाठी सध्याचे सरकार वारंवार पाठपुरावा करूनही व आमदार रोहित पवार यांनी स्मरणपत्र देऊनही टाळाटाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कर्जत जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि युवा वर्ग थेट मंत्रालयात गेल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रालयात कर्जत जामखेडच्या युवा व नागरिकांनी उद्योग व खनिकर्म प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे व मंत्रालय मुख्य सुरक्षा अधिकारी पोलिस उपायुक्त प्रशांत परदेशी यांची भेट घेऊन त्यांना एमआयडीसीबाबतच्या उपोषणाचे पत्र दिले आहे. 

मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागाच्या मार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी व ड्रोन सर्वेक्षण होऊन सर्वात उच्च असलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली होती. एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी याबाबत वेळोवेळी आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला तसेच उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला आहे. त्यावर मंत्री महोदयांनी निर्णय घेण्याबाबत आश्वासित केलं. परंतु, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. 

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांच्या भेटीमध्ये आमदार रोहित पवार यांनी दोघांकडेही मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंती दिनांक 26 जून 2023 पर्यंत पूर्ण कराव्यात अशी विनंती केली आहे. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत जर याबाबत ठोस निर्णय होऊन कर्जत जामखेडमधील जनतेवर राजकिय द्वेशापोटी होणारा अन्याय दूर झाला नाही तर 26 जून 2023 पासून सर्व नागरिक, युवा वर्गासह हजारोंच्या संख्येने या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले होते. 

त्यानुसारच आता मतदारसंघातील नागरिक व युवांनी थेट मंत्रालय गाठून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीपर्यंत एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळाली नाही तर आपण उपोषणावर ठाम असल्याचे दाखवून दिले आहे. तशा आशयाचे पत्रही यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देऊन याबाबत सतर्क केले आहे. त्यामुळे आतातरी एमआयसीडीबाबत हे सरकार राजकीय द्वेष बाजुला ठेवून निर्णय घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली असताना सुद्धा सरकार बदलल्यामुळे आणि कदाचित राजकीय दबावामुळे उदय सामंत साहेब माझे मित्र असले तरी अंतिम मंजुरी मिळण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. कदाचित रोहित पवारांना श्रेय मिळू नये यासाठी हे सर्व असावं. पण याच्यात अनेक युवांचं अतोनात नुकसान होतंय. हे काही राजकीय व्हिजन नसलेल्या नेत्यांना कळत नाही. हा सर्व प्रकार म्हणजे जेवण तयार करून ठेवलंय पण ताटच वाढलं नाही, असा विचित्र आहे. सरकारला आतातरी जाग येणं अपेक्षित आहे. मी आणि माझ्या मतदारसंघातील युवा आमच्या हक्कासाठी लढणार आणि जिंकणारच – आमदार रोहित पवार
1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker