“लाडक्या बहिणींना अखेरची संधी?” बातमी ठरली फेक!
ई-केवायसीसाठी जिल्हा कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याचा शासनाचा कोणताही निर्णय नाही; महिला व बाल विकास विभागाचे स्पष्ट खंडन

कर्जत | प्रतिनिधी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेबाबत सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या “लाडक्या बहिणींना अखेरची संधी” या बातमीचे अखेर महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे खंडन केले आहे. महिला व बाल विकास विभागाने १९ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून ही माहिती स्पष्ट करण्यात आली.
ज्या महिलांचे ई-केवायसी झालेले नाही त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत, अशी मुभा शासनाने दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र शासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, असा कोणताही निर्णय किंवा आदेश राज्यस्तरावरून देण्यात आलेला नाही.

या चुकीच्या बातमीमुळे राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे समोर आले आहे. शासनाने संबंधित माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता बातमी प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवला आहे.
महिला व बाल विकास विभागाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सोशल मीडियावरील किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. शासनाकडून अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवावा.
दरम्यान, या चुकीच्या बातमीची चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावर पसरत असलेली दिशाभूल करणारी माहिती तात्काळ थांबवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.



