वालवड येथे एसटी, ट्रॅक्टर आणि बोलेरोचा भीषण अपघात — १२ प्रवासी जखमी,


कर्जत (प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील वालवड येथे सोमवारी रात्री सात च्या सुमारास एसटी बस, दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर आणि बोलेरो जीप या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बस चालकासह १२ प्रवासी जखमी झाले असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा ते कर्जत येणाऱ्या एसटी बससमोर ट्रॅक्टरने अचानकपणे वाहन आडवे आणल्याने हा अपघात झाला. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या होत्या, मात्र अपघाताच्या धक्क्याने शेवटची ट्रॉली तुटून वेगळी झाली. त्यानंतर ट्रॅक्टर चालक एक ट्रॉली घेऊन रेकुरीच्या दिशेने पसार झाला.

या भीषण धडकेत एसटी बस चालक संदीप प्रल्हाद बनकर (रा. मिरजगाव, ता. कर्जत) यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बस कंडक्टर अशोकराव माने तसेच एकूण १२ प्रवासी मुक्कामार झाल्याची माहिती आहे.
अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जखमींना तत्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




