अखिल भारतीय चौथे शिक्षिका साहित्य संमेलनाच्या लोगोचे आनावरण


भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभाग आयोजित अखिल भारतीय चौथे शिक्षका साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण नुकतेच महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहासमोर करण्यात आले. याप्रसंगी प्रॅक्टिकल एज्युस्किलचे एम.डी व सीईओ सन्मित शहा, उद्योजक दादासाहेब थोरात, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत राऊत, डॉ. संदीप काळदाते, प्राचार्य राजकुमार चौरे, अनिल तोरडमल, प्रा. विशाल म्हेत्रे, रामदास काळदाते, घनश्याम नाळे, पत्रकार गणेश जेवरे, रवींद्र जगदाळे, सचिन धांडे, सारिका कदम, सुभाषचंद्र तनपुरे, प्रकाश धांडे आदि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील स्त्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्त्री हक्काच्या प्रणेत्या, स्त्री शिक्षणाच्या उदगात्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा मिळावा, स्त्री सक्षमीकरणाचा जागर व्हावा, म्हणून दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील मराठी विभागाच्या वतीने चौथे अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलन शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आयोजित केले आहे.

या संमेलनात अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्रातील शिक्षिका, साहित्यिक सहभागी होणार आहेत. नवसाहित्यिक शिक्षिकांना सशक्त विचारपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांचे अर्थविश्व व नवतंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य विश्वाकडे शिक्षिकांच्या असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी एक दिवसाचे अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे ही चौथे वर्ष असून या संमेलनास एक हजारपेक्षा जास्त शिक्षिका सहभागी होणार आहेत.
या संमेलनामध्ये पहिल्या सत्रामध्ये पुरस्कार वितरण, दुसऱ्या सत्रामध्ये “तुझीया नामाचा गजर-भक्तिमय नाटिका” हा नाट्यप्रयोग, तिसऱ्या सत्रामध्ये गोलमेज चर्चा, चौथ्या सत्रामध्ये निमंत्रित कवयित्रींच्या कविता, पाचव्या सत्रात पारितोषिक वितरण समारंभ व समारोपीय सत्र आयोजित केले आहे. तरी या संमेलनास जास्तीत जास्त शिक्षिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व संमेलनाचे संयोजक डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.




