रस्ता दुरुस्ती की धुळीचा कारखाना? कर्जत-कुळधरण रोडवर व्यापारी हैराण!
सा.बां.वि.चा कुचकामी कारभार चर्चेत; खडी-मुरूम-जीएसबीच्या प्रयोगानंतर धुळीचे साम्राज्य

कर्जत : कर्जत-कुळधरण रोडवरील रस्त्याची दुरवस्था, प्रचंड धुराळा आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे या मार्गालगतचे व्यावसायिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वेगवेगळे प्रयोग केले जात असताना रस्त्याची समस्या सुटण्याऐवजी धुळीचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कुचकामी कारभारावर व्यापारी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रभातनगर या अवघ्या एक किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रस्त्यावर खड्डे पडले की खडी टाकायची, पुन्हा खड्डे पडले की मुरूम टाकायचा आणि त्यानंतर जीएसबीचा प्रयोग करायचा; मात्र या सगळ्या प्रयोगांनंतरही रस्ता व्यवस्थित होण्याऐवजी नागरिकांच्या नशिबी धूळच का येते? असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही महिन्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्जत दौऱ्यावर आले असताना या रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न चर्चेत आला होता. त्यानंतर डांबर टंचाईचे कारण देत जीएसबी टाकण्यात आले. मात्र, जीएसबी टाकल्यानंतर त्याचे योग्य रोलिंग झाले का? त्यावर पाणी मारण्यात आले का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर टाकलेली खडी उखडून वाहनांच्या टायरखालून हवेत उडत आहे. एखादे वाहन गेले की धुळीचे लोट थेट दुकानांमध्ये घुसत आहेत. परिणामी व्यावसायिकांना मास्क लावून व्यवसाय करावा लागत असून, धुळीपासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने रस्त्यावर पाणी मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
रस्ता जनतेचा आणि धुळीचा त्रासही जनतेचाच; मग सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी नेमकी कुठे संपते? असा बोचरा सवाल व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.
या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने धुळीसोबत वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर झाली आहे. कोंडीच्या वेळी वाहनचालकांकडून कर्णकर्कश हॉर्न वाजविले जात असल्याने व्यापाऱ्यांना दिवसभर धूळ आणि हॉर्न या दुहेरी ‘शिक्षेला’ सामोरे जावे लागत आहे.
याशिवाय मुरूम, वाळू आणि खडी वाहून नेणारी अनेक वाहने या मार्गावरून भरधाव वेगाने धावत असल्याच्या तक्रारी आहेत. या वाहनांच्या वेगामुळे पादचारी, व्यापारी आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघात घडल्यानंतरच प्रशासनाच्या फाईलींना चाके लागणार का? असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या संपूर्ण परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणांचे पुरेसे लक्ष नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. रस्त्याची दुरवस्था, धुराळा, वाहतूक कोंडी आणि भरधाव वाहने या सगळ्याचा एकत्रित परिणाम स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर तसेच त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
खड्डे बुजविण्याच्या नावाखाली वर्षानुवर्षे खडी-मुरूम-जीएसबीचे प्रयोग सुरू राहणार आणि प्रत्येक प्रयोगानंतर कर्जतकरांनी धुळीचा श्वास घ्यायचा, हा ‘कारभार’ आणखी किती दिवस चालणार? असा सवाल आता थेट प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच उपस्थित होत आहे.
कर्जत-कुळधरण रोडची शास्त्रोक्त पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, रस्त्यावर नियमित पाणी मारावे, वाहतूक कोंडीचे नियोजन करावे तसेच भरधाव आणि जड वाहनांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांकडून होत आहे.
धुळीने व्यापाऱ्यांचा व्यवसाय धोक्यात; प्रशासन मात्र कागदावरच?
रस्त्यावर धूळ उडतेय, व्यापाऱ्यांच्या दुकानात धुराळा भरतोय, वाहनांच्या हॉर्नने कानठळ्या बसत आहेत आणि अपघाताची भीती कायम आहे. तरीही संबंधित यंत्रणांना जाग येत नसेल, तर कर्जतकरांनी याला ‘निष्क्रिय कारभार’ म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.




